Pages

Mt. Kinabalu (4095.2 m)

Highest peak in South-east Asia
Location: Kota Kinabalu, Malaysia


Me, with my parents and sister


This is the article written by Dr. Kalpana Dilip Phal (mom). Click here for original content.

साहस पर्यटनाची संकल्पना अजूनही आपल्या देशात बाल्यावस्थेतच आहे. मलेशियात मात्र त्याचे प्रगत रूपच पाहायला मिळाले. साहस पर्यचनाकडे जास्तीत जास्त पर्यटक कसे आकर्षित करता येतील, हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. दक्षिण आशियातील सर्वात उंच अशा किनाबलू शिखराची मोहीम हा त्याचाच एक दाखला.

पर्यावरणाच्या दृष्टीने बोर्निओ (Borneo) हा उत्तर मलेशियातील एक समृद्ध प्रांत, त्यातील साबा (Sabah) राज्य म्हणजे मलेशियातील इतर पर्जन्यवनांचा शिरपेचच! त्यातील कोटा किनाबलू राष्ट्रीय अभयारण्य म्हणजे पर्यटकांना पर्वणीच म्हणावी लागेल. 754 चौ. किलोमीटरवर पसरलेल्या या विस्तीर्ण अभयारण्यात इतके जैववैविध्य आढळते, की पाहणाऱ्याची "दुबळी माझी झोळी' अशीच अवस्था होते. जागतिक वारसा लाभलेल्या या किनाबलू पार्कातूनच (पूर्वीची) (Sesolton) आता शिखराच्या नावामुळे कोटा किनाबलू म्हणूनच संबोधली जाते. या शहरातूनच वळणवळणाच्या सुमारे 2-3 तासांच्या सुखद प्रवासानंतर आपण किनाबलू पार्कच्या मुख्य स्वागतिकेशी पोचतो. (उंची 1563 मीटर.) अर्थात इथे पोचून आपण आपल्या शिखराच्या मोहिमेचा 1/3 टप्पा गाठलेला असतो. 15 फुटांपेक्षा उंच वृक्षराजींनी वेढलेले हे अभयारण्य पाऊल ठेवताक्षणीच वेड लावते. त्यातून परिसराची सुसूत्र बांधणी, रस्ते, निवास आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्तम व्यवस्थापन हे चढत्या क्रमाने आपल्याला आनंद देत राहताच. पार्कची भेट व शिखराची मोहीम पूर्वनियोजन व आरक्षणाशिवाय अशक्‍यच आहे.


स्वागतिकेत खरोखरच आपले स्वागत होते ते हसतमुख सदातत्पर परिचरांकडून. आपण तेथे गेल्याबरोबर ते आपला अक्षरशः ताबाच घेतात व आपल्याला कोणती सेवा कशी, कुठे व केव्हा मिळेल याची इत्थंभूत माहिती देतात. सगळेच prepaid असल्याने फसवाफसवी, घासाघिशीचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. निवास, भोजन, नाष्टा व दुसऱ्या दिवसापासून आपल्यासोबत येणाऱ्या परवानाधारक वाटाड्यांची व्यवस्थित माहिती वेळापत्रकासह आपल्याला पुरविली जाते. नोंदणीचे सोपस्कार अशा रीतीने पार पाडल्यानंतर निवासाकडे ने-आण करणारी गाडी आपल्यासाठी तयारच असते. ही निःशुल्क वाहनसेवा 24 तास उपलब्ध असते. या व इतर सोयींसाठी स्वागतिकेशी इंटरकॉमने संपर्क साधायचा अवकाश, की सेवक हजर! जास्तीत जास्त लाकडाचा वापर करून बांधलेली निवासस्थाने. व्हरांडे, रस्ते पर्यावरणला शक्‍यतो बाधा न आणणारे व पर्यटकांना भुरळ पाडणारे आहेत. पोचल्यानंतरची संध्याकाळ रम्य परिसर न्याहाळायला अपुरी पडते. मन भरून पार्कमध्ये फिरून झाले नसले, तरी दुसऱ्या दिवसाच्या मोहिमेचे वेध मनाला लागलेले असतात. रात्रीचे जेवण स्वागतिकेजवळच्या पंचतारांकित हॉटेलातच आयोजित केलेले असते. निवासस्थानातील एका कॉमन हॉलमध्ये रात्री शेकोटी-कॉफी-चहाची व्यवस्था असते. तेथेही पार्कमध्ये काय पाहाल याचे सुंदर तक्ते लावले आहेत. सकाळचा नाष्टा व पॅक लंचही त्या ठराविक हॉटेलातूनच घेऊन सकाळी लवकर स्वागतिकेत हजेरी लावणे गरजेचे असते. थंडी, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणारी साधने घेऊन बाकी सर्व जास्तीचे सामान स्वागतिकेत कुलूपबंद करून निघणे फायद्याचे ठरते.

किनाबलू पर्वतरांगा कोटा किनाबलू शहराच्या उत्तरेकडे पूर्व, पश्‍चिम पसरली आहे. तब्बल 4095.2 मीटर उंचीवर! त्यातील सर्वांत उंच Lows peck हेच मोहिमेचे उद्दिष्ट असते. Aki (पूर्वज), Nabalu (पर्वत) या स्थानिक रहिवाशी जमातीच्या भाषेतून "kinabalu' हे नामकरण झाले, असे सांगितले जाते. स्थानिक कडसन उनसन जमात आपल्या सह्याद्रीतील ठाकर वगैरेंसारखीच काटक, कष्टकरी जमात. हल्ली वाटाडे, हमाल म्हणून याच जमातीतील लोकांचा भरणा असला, तरी पूर्वी या पर्वतरांगांच्या कुशीतच त्यांचे वसतिस्थान होते. इ. स. 1851 मध्ये ब्रिटिश पर्यटक Sir Huge Low याने मोहीम आखली खरी, पण त्यापूर्वी शिखरमाथ्यावरचे पूर्वज वर जाणाऱ्याला फेकून देतील, अशीच दृढ श्रद्धा या जमातीत होती; पण त्या धाडसी ब्रिटिशाने आपण पूर्वात्म्यांना संतुष्ट करण्यासाठी बळी वगैरे देतो, अशी समजूत घातली व मोहीम सर केली. पण तेव्हापासून मोठ्या मोहिमेपूर्वी अजूनही बळी देण्याची प्रथा मात्र कायम राहिली. तरीदेखील Sir Huge Low ते पर्यटकांचा मार्ग खुला केल्याबद्दल त्याचे मानावे तेवढे उपकार कमीच!


शिखरावर पोचण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण अथवा पूर्वानुभवाची आवश्‍यकता नसली, तरी वाटेतल्या छाती दडपून टाकणाऱ्या चढांवर क्षमतेची कसोटी पणाला लागते. म्हणूनच मलेशियाच्या ट्रिपमध्ये 2 दिवसांत किनाबलू होईल अशी अपेक्षा मात्र कोणी ठेवू नये. पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिमेची सुरवात होते. स्वागतिकेत मागे सांगितल्याप्रमाणे नाष्टा, पॅक लंच व आपले एक दिवस पुरेसे कपडे, विजेरी (Head lamp) घेऊन 8 वाजताच हजर राहावे लागते. आपला वाटाड्या ओळखपत्र, नोंदणी क्रमांक हे सगळे सोपस्कार पार पाडतो व 4 किलोमीटरवरील Typhon gate कडे आपल्याला नेले जाते. पुन्हा नोंदणीचे सोपस्कार होतात. इथे आपण आपल्या कळसूबाईइतके म्हणजे सुमारे 1866 मीटर उंचीवरप पोचलेलो असतो. या गेटवरून दोन मार्ग आहेत. एक जैवविविधतेमध्ये रस असणाऱ्या अभ्यासकांसाठी व दुसरा शिखर चढाईचेच अप्रूप असणाऱ्यांसाठी. पैकी पहिली (Mesilau roufe) जरा जास्त वेळ काढणारा आहे. मात्र दोन्ही मार्ग Layang layang थांब्याशी एकमेकांना मिळतात. दोन्ही वाटा दाट जंगलाने वेढलेल्या आहेत. शक्‍यतो निसर्गावर आक्रमण न करता झाडाच्या मुळांचा, लाकडी पुलांचा व पायऱ्यांचा वापर करून चढाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या सदाहरित दंगलात तापमान कमी असले, तरी चढताना आपण घामाघूम होऊन जातो. अगदी सुरवातीला एक उतरण आहे ती Carson या धबधब्याशी थांबते. (Carson हा पार्कचा पहिला वॉर्डन.) धबधब्याचे अस्तित्व आवाजामुळे खूप आधीच जाणवू लागते; पण हा सुंदर धबधबा संपला, की लगेचच जीवघेण्या चढणीला सुरवात होते. प्रत्येक 1 ते 1।। कि.मी.वर याप्रमाणे 6 थांबे (Pondok) आपल्याला दिलासा देण्यासाठी आहेत; पण 5 ते 6 तासांत म्हणजे दुपारी 3 पर्यंत पार करणे जरुरीचे असते. कारण आपण रात्रीच्या मुक्कामावर पोचणे आवश्‍यक असते. संध्याकाळी पडणारा पाऊस अन्यथा आपल्याला त्रासाचा होऊ शकतो. Kandis, Ubah, Lowis, Layang Layang Villosn, Paca हे थांबे. सर्वच्या सर्व लाकडाचे आहेत. प्रत्येक थांब्याशी जाळीबंद कचऱ्याचे डबे आहेत. त्यामुळे भरपूर प्रमाणात असलेल्या खारी किंवा छोट्या सशांसारखे प्राणी येऊन कचरा पसरवीत नाहीत. तेही पर्यटकांना इतके सरसावलेत, की चाहूल लागताच पळून तर जात नाहीतच, पण आपल्याला बघत थांबतात. वाटेत आजूबाजूला काय पाहाल याचे सचित्र वर्णनही (पुन्हा जाळीबंद) तक्‍त्यावर लावले आहे. त्याचा खूप फायदा असतो. शिवाय वाटाडेही खूप माहिती देतात. सर्वांत दिलासा देणारी गोष्ट जी आपल्याकडे अभावानेच आढळते, ती म्हणजे भरपूर पाणी असणारी प्रसाधनगृहे प्रत्येक थांब्यावर आहेत. वीज व पाणी अगदी वरपर्यंत पोचले आहे. वर नैसर्गिक पाण्याचा काहीही पर्याय उपलब्ध नाही.
पर्जन्यवनातील विविध वृक्षांपैकी बांबू, ओक आणि उंबराच्या जातीचे वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. भूगर्भाच्या 3 वेगळ्या प्रकारांमुळे चढणीवर 3 टप्प्यांत वेगवेगळ्या वनस्पतींचे प्रकार पाहायला मिळतात. layang layang पर्यंत दाट जंगल Ultramarfic soil चा तांबडा पट्टा सुरू झाला, की विरळ होऊ लागते. उंची वाढते तशी खुरट्या वनस्पतींची दाटी सुरू होते; पण त्यांचे विविध आकार, रंगसुद्धा पाहता पाहता पुरेवाट होते. दमछाक झाली असली, तरी हे पाहणे चुकवू नये. कारण आम्हाला उतरताना संततधार पावसामुळे काहीही पाहता आले नव्हते. तेव्हा थोडा उशीर झाला तरी हे चुकवू नये असेच आहे. बोर्निओत आढळणाऱ्या 30 जातीच्या घटपर्णीपैकी 10 जाती एकट्या किनाबलूत आहेत, तर जगातल्या अत्यंत दुर्मिळ अशा 3 व सर्वांत मोठ्या घटपर्णीची नोंद ही किनाबलूच्या नावावर आहे. घटपर्णीची (Pitcher Plant) विविध रूपे (वाटाड्याच्या मदतीने) पाहायला मिळायला नशीबच लागते. याशिवाय गवताच्या काडीसारखे, पानांसारखे व विविध रंगांतील कीटक व पर्यायाने पक्षी यांची रेलचेल वाटेवर आहे. फक्त इच्छा असून चालत नाही, त्या दृष्टीनेच वाटचाल केली तर Forked tail grey drongo, mountain black bird, Malaysian tree pic, Trogon, Spider hunter अशा दुर्मिळ पक्ष्यांचेही दर्शन आम्हाला घडले. सगळी लयलूट शक्‍य तेव्हा कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेतली हे बरे झाले, नाहीतर एकदा सुरू झालेला पाऊस संपणे आपल्या हातात नसल्याने पूर्ण मोहिमेवर पाणीच पडण्याची शक्‍यताही खूप असते. Laban Rata च्या मुक्कामी पोचायला आम्हाला त्यामुळे उशीर झाला त्याचे दुःख वाटले नाही व दुसऱ्या दिवशी तो एक निर्णय योग्यच ठरला म्हणून मनालाही खूप हायसे वाटले. शिवाय चढतानाचे श्रम व एकसुरीपणाही जाणवला नाही, हेही तसे थोडके!


Laban Rata ला आपण पोचतो म्हणजे 3060 मीटरपेक्षा जास्त उंचीवर विरळ हवामानाचा त्रास जाणवू लागतो, आणि आता सुरू होतो पूर्ण ग्रॅनाइटचा पट्टा. ग्रॅनाइटचे पांढरे शुभ्र बोल्डर्स एक वेगळीच पार्श्‍वभूमी तयार करतात. Laban Rata चा मुक्काम विरळ हवेशी दोस्ती व्हावी म्हणूनच असावा. आपले नशीब बलवत्तर असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी पाऊस पडला नाहीतर सूर्यास्ताचे एक वेगळे मनोहारी रूप विश्रांतिगृहातून अनुभवायला मिळते. उंचीमुळे थंडी, पर्जन्यवनाचा पाऊस, विरळ हवा तरीही खरोखरीच सगळे आल्हाददायक वाटत असते. या उंचीवरील अतिशय सुसज्ज अशा निवासांची सोय वाखाणण्यासारखी आहे. संध्याकाळीच जेवण आटोपून लवकर झोपी जाण्याचा सल्ला गाईड आपल्याला देतो. शिवाय पहाटेलाच (supper) पॅक करून घ्यायला सांगतो. त्याचे निवासस्थान स्वतंत्र असले, तरी तो आपली बऱ्यापैकी काळजी घेतो, हेही एक नमूद करावेसे वाटते. संध्याकाळी थंडी अथवा पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता असते, त्यामुळे आपण 7-7।। लाच झोपलेले फायद्याचे ठरते. दुसऱ्या दिवशी पहाटे 2.00 वाजता शेवटच्या 1000 मीटरवर आपली परीक्षा असते. त्यासाठी पुरेशी विश्रांती जरुरीची ठरते. जर पाऊस खूपच पडला तर मोहीम Laban Rata तच संपते. पण आम्ही भाग्यवान ठरलो. पावसाने रात्रीच आटोपते घेतले.


रात्री 2.00 वाजता हातमोजे, पायमोजे, विंडचिटर कम जॅकेट व हेडलॅम्पसह सुटायचे. त्या वेळीसुद्धा गेटवर पुन्हा नोंदणी होते. डोळ्यांवरची झोप उडालेली नाही. त्यातून थंड बोचरे वारेही मनात peak वर जाण्याची दुर्दम्य इच्छा आपले पाय आपोआपच ओढत राहते. अभावानेत दिसणारी झाडे ग्रॅनाइटचे लांब व उंच पसरलेले खडक, नीरव शांतता, वर आकाशात तारे, अशी पार्श्‍वभूमी! क्षणभर मनात विचार येतो- आपण आपल्या देशापासून किती दूर, कोणत्या हेतूने चाललोय? पण हा परदेश आहे असे मुळी वाटतच नाही. इतक्‍या उंचीवरच्या पाय न घसरता वर चढू देणाऱ्या त्या ग्रॅनाइटच्या खडकांचे अप्रूप वाटते. आपल्या तपोवनइतक्‍या उंचीवर बर्फ कसे नाही, याचेही आश्‍चर्य वाटते. आपण गंगोत्री ते गोमुख पहाटे चाललोय, असे काहीसे वाटते. वर नजर गेल्यावर आपल्या पुढे गेलेल्या पर्यटकांचे हेडलॅंप रांगेने दिसतात. ते खरेच इतके विलोभनीय वाटते! पण क्षणभरच! लगेच जाणीव होते आपण मागे पडल्याची! 1 तासात Pohaan Rata या 500 मीटरच्या अंतरावरील थांब्यावर आपण पोचतो. आता लक्ष्य टप्प्यात आलेले असते, तरी शेवटी 500 मीटरची चढाई विरळ हवेमुळे नाकी नऊ आणते. पाय, शरीर साथ देत नसले तरी आता मन मात्र पुढे धावत असते. कारण बोचऱ्या वाऱ्याच्या सोबत ढग आणि पाऊस आला तर सूर्योदयासाठी केलेला आटापिटा व्यर्थ ठरेल, ही भीती मनात आल्यावाचून राहत नाही. अखेर शिखरावर पोचताच आपोआपच तोंडातून आनंदाने चीत्कार बाहेर पडतो. पण मनावर ताबा ठेवून तसे न करता शांतपणे त्या क्षणाचा उपभोग घ्यावा. आजूबाजूला ढगांचा समुद्र आपण शिखराच्या जहाजावर बसलोय असे क्षणभर वाटते. क्षणभर आपण कोण, कुठे- सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला असतो. पूर्व-पश्‍चिम पसरलेल्या रांगेतल्या Lows Peak या अत्युच्च शिखरावरून बाजूची South peak, donkey's ears, St. John अशी शिखरे खुणावत असतात. क्षितिजाचे रंग पालटलेले बघणे हीच सूर्योदयाची जाणीव अनुभवून उतरायला सुरवात करावी लागते. कारण आता कालचे व आजचे मिळून अंतर एकाच दिवसात (5-6 तासांत) पार करून पुन्हा Typhon गेटला पोचायचे असते. मन पुन्हा पुन्हा विश्‍वनिर्मात्याचे आभार मानू लागते. आपले यत्किंचित अस्तित्व जाणवू लागते. मीपण गळून जाणे, ब्रह्मानंदी टाळी लागणे, अशी अनेक आध्यात्मिक विधाने आठवू लागतात, पण योग्य शब्द सापडत नाहीत. मनाने अनुभवायचेच असे काही क्षण त्याने आपल्याला प्राप्त करून दिले म्हणून खरोखच कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्याचीच प्रार्थना करायची. माझी 11 लाखांची (2 पायांची) गाडी शाबूत ठेव आणि मला असेच काही सुवर्णक्षण अनुभवण्याची संधी दे!


असे विचार मनात घोळत असतानाच Laban Rata पर्यंत परत येऊन पोचतो तेव्हा खरेच स्वर्गातून खाली आलो आहोत असे वाटते. परतीचा प्रवास (आम्हाला पाऊस संततधार लागल्याने) कंटाळवाणा झाला तरी इच्छापूर्तीचे समाधान होतेच. सर्व नोंदणी व्यवस्थित असल्याने कोणी उशिरा पोचिले किंवा परतले नाही त्यांची खरोखरच खाली वाट बघत असतात. रोज सुमारे 150 पर्यटक चढतात तितकेच उतरतात. बहुतांश पर्यटक पाश्‍चिमात्य. क्वचित आशियाई व अभावानेच भारतीय. खरे तर नॅशनल पार्क पाहायला आणखी एक दिवस मुक्काम आवश्‍यक आहे. म्हणजे स्वर्गातून धाडकन पृथ्वीवर आल्यासारखेही वाटणार नाही. आपल्याला दीड दिवसाची चढाई ।। दिवसात उचरणे शिकस्तीचे वाटते, पण दर वर्षी येथे ऑक्‍टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय climbethon स्पर्धा भरवली जाते. जागतिक उच्चांक पुरुषांसाठी 2 तास, महिलांसाठी 3 तास! विश्‍वासच बसत नाही ना?

पण काही असो, नेहमी धूळभरल्या रस्त्यावरून धावणाऱ्या एसटीने पायथा गाठून सह्याद्रीचे कडेकपारी तुडवताना आनंद मिळवायची सवय लागलेल्या मनाला हा "पंचतारांकित' ट्रेकही खूप वेगळ्या विश्‍वात घेऊन गेला. हिमालय नको, पण महाराष्ट्रात असे कितीतरी ट्रेक आपण करू शकू व पर्यटकांना आकर्षित करून महाराष्ट्राची एक नवी ओळख निर्माण करू शकतो.

धन्यवाद, 
डॉ. कल्पना दिलीप फळ  


No comments:

Post a Comment

Our most recent adventure...

Chanderi fort trekking

Date: January 2021 Trek type: Jungle fortress, 714 m Difficulty: Walking on moderate to difficult terrain (no rock-climbing) Availability of...